बाणेर : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार किरण रायकर यांनी आज नागरिकांच्या उपस्थितीत आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
जाहीरनाम्यात रायकर यांनी प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.तसेच, भारत देशातील सर्वात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर प्रभागात साकारण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात आला. हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख निर्माण करणारे केंद्र ठरेल, असे रायकर यांनी सांगितले.
आपल्या भाषणात किरण रायकर यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, “मी निवडून आलो तर प्रभागातील प्रत्येक समस्या नागरिकांना विश्वासात घेऊन, पारदर्शकपणे आणि प्राधान्याने सोडवली जाईल.”
या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आली असून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
























