जयेश मुरकुटे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांची प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपस्थिती; शेकडो नागरिकांच्या सहभागाने भव्य पदयात्रा

बाणेर : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपस्थित राहून भव्य पदयात्रेत सहभाग घेतला. या पदयात्रेला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

पदयात्रेदरम्यान रोहित पवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत जयेश मुरकुटे यांच्या कार्याची, शिक्षणाची आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची माहिती दिली. जयेश मुरकुटे हे उच्चशिक्षित, सुशिक्षित तरुण नेतृत्व असून प्रभागातील मूलभूत प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत, असे सांगत नागरिकांनी त्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. जयेश मुरकुटे यांच्यासारखा तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवार प्रभागाला नवी दिशा देऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.”

पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी जयेश मुरकुटे यांना विकासाच्या मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत सकारात्मक प्रतिसाद दिला. रोहित पवार यांच्या उपस्थितीमुळे कर्जत जामखेड, तसेच मराठवाड्यातील मूळ रहिवासी असलेल्या नागरिकांनी देखील यावेळी जयेश मुरकुटे यांना पाठिंबा दिला. या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक वातावरण अधिक तापले असून जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. यावेळी सुसगाव येथील प्रचारामध्ये शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

See also  पुणे महानगरपालिकेच्या सक्तीच्या भूसंपादन बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत प्रस्तावांचा आढावा बैठक