अमोल बालवडकरांचा ‘कार्यकर्ता पॉवर’ विजय” ९०० मतांनी दणदणीत विजय, ज्याचा शेवट गोड.. ते सर्वच गोड! म्हणत कार्यकर्त्यांनी डिवचले

पुणे : प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मधील पुणे महापालिका निवडणूक ही शहरातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतींपैकी एक ठरली. भाजपकडून तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

ही लढत केवळ उमेदवारांमधील नव्हे, तर ‘कार्यकर्ता विरुद्ध नेता’ अशीच असल्याची भूमिका अमोल बालवडकर यांनी सुरुवाती पासून मांडली होती. विशेष म्हणजे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघातीलच प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांनी थेट आव्हान उभे करत आक्रमक प्रचार केला होता.

भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभावाला आव्हान देत अमोल बालवडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत अखेर अमोल बालवडकर यांनी ९०० मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली.

या निकालामुळे पुणे शहरातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, भाजपसाठी हा पराभव धक्कादायक मानला जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी हा विजय राजकीय ताकदीचे प्रदर्शन ठरला आहे.

अमोल बालवडकर म्हणाले, ही लढाई सोपी नव्हती कार्यकर्त्यांच्या कष्टाचा जीवावर तसेच मतदारांच्या प्रेमामुळे विजयी झालो. कार्यकर्त्यावर अन्याय झाला होता म्हणून सगळ्यांनी लढण्याचे बळ दिले आणि तू लढले पाहिजे असे सांगितले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी तिकीट दिले व पाठीशी उभे राहिले यामुळे हा विजय झाला.

See also  टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे