हवेली तालुक्यात निवडणूक प्रशिक्षणाची पहिली फेरी यशस्वी; १,९६० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

हवेली : जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने पहिले निवडणूक प्रशिक्षण नुकतेच यशस्वीपणे पार पडले.

या प्रशिक्षण सत्रात एकूण १,९६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व्यवस्थापन, मतदार यादी, मतदान केंद्र व्यवस्थापन, आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी तहसीलदार मा. अर्चना निकम व तहसीलदार मा. तृप्ती कोलते यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत शिस्त, जबाबदारी व कायदेशीर बाबींचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशिक्षण सत्रात प्रा. माधुरी माने, गोपाल जाधव व प्रा. भूमेश मसराम यांनी मतदान प्रक्रिया, कर्मचारी जबाबदाऱ्या, संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर व प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाची स्पष्ट समज मिळाल्याचे सहभागी कर्मचाऱ्यांनी सांगितले.या पहिल्या प्रशिक्षणास १८६ कर्मचारी गैरहजर राहिले. प्रशासनाकडून या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, प्रशिक्षणाबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक तयारीच्या पुढील टप्प्यात दुसरे प्रशिक्षण दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी ३७० टीम्स तयार करण्यात आल्या असून, सर्व टीम्सना अद्ययावत व सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी प्रमोद भांड, धम्मदीप सातकर व साहिर सय्यद, प्रवीण नलावडे, प्रियांका जोशी, स्नेहल शेलार, प्रियांका सुंदर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वी, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत असल्याचे या प्रशिक्षणातून स्पष्ट होत आहे.

See also  पाच टक्के कॅन्सर मोबाईलमुळे वैज्ञानिकांचा शोध -पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे