पुण्यात ‘भारत भारती’चा भव्य माजी सैनिक मेळावा संपन्न
राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राले व कर्नल तुषार जोशी यांचे मार्गदर्शन

पुणे :पुणे येथील केसनंद परिसरातील ऑफिसर्स करिअर अकादमी येथे ‘भारत भारती’ संस्थेच्या वतीने भव्य माजी सैनिक समागम व जनसभा यशस्वीरीत्या पार पडली. हा कार्यक्रम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त (सार्धशताब्दी महोत्सव) तसेच पराक्रम दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते भारत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विनयजी पत्राले यांनी माजी सैनिक व उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राष्ट्रनिर्माणात सैनिकांचे अतुलनीय योगदान अधोरेखित केले.विशेष अतिथी म्हणून एनएसजी कमांडर कर्नल तुषार जोशी (सेना मेडल) यांची गौरवशाली उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात कर्नल जोशी यांनी अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सविस्तर उल्लेख केला. या अत्यंत कठीण मोहिमेत स्वतः सहभागी असून संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व केल्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

वक्त्यांनी राष्ट्रप्रेम, कुटुंबबोध, सामाजिक दायित्व तसेच शिस्तबद्ध नागरिक जीवनाच्या महत्त्वावर विशेष भर दिला.या कार्यक्रमास भारत भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रदेश सचिव धर्मेंद्र सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ऑफिसर्स करिअर अकादमीचे प्रा. अमित दुबे, सूरजपाल सिंह, संजू तिवारी, अपर्णा चक्रवर्ती, मेघा चिंतल, सुरेश कुमार विश्वकर्मा, भीम अग्रवाल, अंजनी पांडे, नीलकंठ तिवारी, मनीष मेहता, रणजीत जैना, पानसरे, संजय हसिजा, जितेंद्र कुमार सिंह आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

राष्ट्रहिताचे ‘पंच-संकल्प’
समागमादरम्यान भारत भारती संस्थेच्या पाच मूलभूत राष्ट्रहितकारी उद्दिष्टांवर विचारमंथन करण्यात आले—
स्वबोध : आत्मनिर्भरता व स्वदेशी वस्तूंचा वापर
सामाजिक समरसता : जातीय भेदभावाचे उच्चाटन व सामाजिक एकात्मता
कुटुंब प्रबोधन : कौटुंबिक मूल्ये व संस्कारांचे जतन
पर्यावरण संरक्षण : नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व निसर्गाबद्दल आदर
नागरिक शिष्टाचार : कर्तव्यबोध व राष्ट्रहितासाठी सक्रिय सहभाग
समारोप
गेल्या १६ वर्षांपासून पुण्यात सक्रिय असलेली भारत भारती संस्था महाराष्ट्रासह गुजरात, आसाम, बिहार व उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जागृतीसाठी कार्यरत आहे.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक सहभोजन तसेच “वंदे मातरम्” व राष्ट्रगीताच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

See also  संकल्प यात्रेच्या नावे मोदींची हमी नव्हे जुमलेबाजीच! - आम आदमी पार्टी