मार्शल आर्ट्स प्रशिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकासाची नवी दिशा

पुणे : स्कूल ऑफ मार्शल आर्ट्सतर्फे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल सभागृह, पर्वती, पुणे येथे बेल्ट वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध वाटचालीचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा केवळ बेल्ट प्रदान करण्याचा सोहळा नसून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नव्या टप्प्याचा प्रेरणादायी प्रारंभ ठरला.

कार्यक्रमास मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. प्रतिभाताई चोरगे, नगरसेविका, पुणे महानगरपालिका उपस्थित होत्या. तसेच मा. श्री. रोहिदासबापू चोरगे, संस्थापक अध्यक्ष, युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव, भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे तसेच डॉ. कल्याणी चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष मा. श्री. विकास बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मार्शल आर्ट्सची विविध प्रात्यक्षिके सादर करत शिस्त, आत्मसंयम आणि तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे उत्स्फूर्त कौतुक केले.

मा. सौ. प्रतिभाताई चोरगे यांनी विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे सांगितले आणि अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये निर्भयता व आत्मविश्वास वृद्धिंगत होतो असे नमूद केले.

प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या भाषणात मार्शल आर्ट्स ही केवळ शारीरिक ताकद वाढविणारी कला नसून ती चारित्र्य, आत्मसंयम आणि नैतिक मूल्ये जोपासणारी जीवनशैली आहे असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना बौद्धिक प्रगतीसोबत शिस्त, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांचाही समतोल विकास घडविणे आवश्यक आहे.

डॉ. कल्याणी चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा व स्वसंरक्षण यांचा समतोल राखावा असे आवाहन केले.अध्यक्ष मा. श्री. विकास बडदे यांनी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करत दर्जेदार आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्याची संस्थेची बांधिलकी अधोरेखित केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीनुसार बेल्ट प्रदान करण्याचा सन्मान सोहळा. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या अभिमानामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

See also  पुण्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी धंगेकरांनी पुढाकार घ्यावा

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास यांची सांगड घालत हा समारंभ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.