पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या “दावत-ए-इफ्तार” कार्यक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

पुणे : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या “दावत-ए-इफ्तार” कार्यक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लष्कर पोलीस स्टेशन, जमियत उलेमा-ए-हिंद पुणे आणि महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आझम कॅम्पस, कॅम्प येथील असेंब्ली हॉल समोरील बॅडमिंटन कोर्ट येथे पार पडला.

या इफ्तार कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये बंधुता, ऐक्य आणि परस्पर सौहार्द वाढवणे तसेच देशात शांतता आणि सलोखा कायम ठेवणे हा होता. कार्यक्रमात विविध धर्मांचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभागी होत सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला.

या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  अपर पोलीस आयुक्त मा. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मा. राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता शिंदे अल्फान्सो तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंस चे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन आणि जमियत उलमा ए हिंद, पुणे अध्यक्ष कारी इद्रीस अन्सारी यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून, आपापसातील भाईचारा वाढवून देशात शांतता आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश या इफ्तार कार्यक्रमातून देण्यात आला.

See also  राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती वळसे पाटील अध्यक्ष