‘विद्यार्थ्यांचा सामाजिक संवाद वाढावा’
– आयपीएस मनोज कुमार शर्मा ; ‘12th Fail’ चित्रपटाचे वास्तवातील नायक आयपीएस शर्मा यांचा विद्यार्थांशी प्रेरक संवाद

पुणे, दि. १ (प्रतिनिधी): ‘आपल्या मुलांनी ९५ टक्क्यांहून अधिकच गुण मिळवले पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते. त्याच्याच बरोबरीने त्यांनी कलात्मक असणे, खेळात प्रावीण्य मिळवणे आणि अखेरीस व्यक्तिमत्त्व घडवणे याही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून ठेवल्या जातात. परंतु, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनण्यासाठी विद्यार्थ्यांचा सामाजिक संवाद वाढणे गरजेचे, असे मत ‘ट्वेल्थ फेम’ चित्रपटाचे वास्तवातील नायक आयपीएस मनोज कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

सहकार व नागरी हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यंदा या उपक्रमाचे २२ वे वर्ष होते. यावेळी मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मोनिका मोहोळ, वासंती जाधव, हर्षाली माथवड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शर्मा पुढे म्हणाले की, ‘आजच्या विद्यार्थ्यांसमोर द्विधा परिस्थिती आहे. जुन्या पिढीतल्या पालकांसाठी आपल्या मुलांनी ६०-७० टक्के मिळवणे ही मोठी गोष्ट होती. आताचा विद्यार्थी ९० टक्क्यांवरही असंतुष्ट असतो. अशा वातावरणात या नव्या पिढीविषयी त्यांच्या पालकांचा तक्रारीचा सूर आढळतो. पण त्यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, त्यांच्या काळात विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि आताच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा यात किती मोठे अंतर पडले आहे. आपण आजच्या विद्यार्थी पिढीवर खूप अपेक्षा लादल्या आहेत’

मोहोळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ सालापर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. या कामी त्यांनी सर्वाधिक विश्वास तरूण पिढीवर दाखवला आहे. कारण, भारताच्या ३५ वर्षांखालील लोकसंख्येचा वाटा सुमारे ६६ टक्क्यांचा आहे. आपला देश जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. त्यामुळे विकसित भारत घडविण्याची जबाबदारी या तरूण पिढीवर अधिक आहे. तसेच, देशातील एक लाख तरूणांनी राजकारणात येण्याची पंतप्रधान मोदीजींची इच्छा असून विद्यार्थ्यांनी राजकारणाकडेही करिअर म्हणून पाहावे’.

जागतिक अर्थकारणात भारतीय तरूणाईचे महत्त्व वाढल्याचे अधोरेखित करताना पाटील म्हणाले, “जग ज्येष्ठांचे होत चालले आहे, भारत तरूणांचा होत चाललाय. त्यामुळे जगाला त्यांचे- त्यांचे देश चालवण्यासाठी भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनींची आवश्यकता भासत आहे. महाराष्ट्रातूनदेखील आपण तब्बल ४ लाख तरूण-तरूणींना जर्मनीत पाठवण्याची तयारी करत आहोत. मेहनत आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर भारतीय विद्यार्थी जगाला गवसणी घालतील, असा मला विश्वास वाटतो.

See also  महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 123038  मतांनी विजयी