मराठाआरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालना : मराठाआरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत आहे. सारथी तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. यापूर्वी सरकारने मराठा समाजाला १६ ते १७ टक्के आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यावर मुलाखती झालेल्या पात्र सुमारे ३ हजार ७०० उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्त्या देण्याचा धाडसी निर्णय घेतला.

इतर समाजाचा आरक्षण अधिकार न डावलता, दुसऱ्या अन्य कुठल्याही जातीचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देणार नाही. मराठा समाजाचा जो अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. अन्य कुणावरही अन्याय न करता #मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे.

मराठवाड्यातील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र, नोंदी, निजाम कालीन दाखले असतील किंवा काही लोकांकडे नसतील त्याबाबत न्या. शिंदे समिती देखील काम करत आहे. ही समिती एका संवैधानिक चौकटीतून काम करेल. ज्याला एक न्यायालयीन दर्जा राहील. या समितीने आपले काम सुरू केले आहे. या समितीची एक बैठक देखील झाली असून उद्या दुसरी बैठक आहे. ज्यात मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या कसा मागास आहे, कागदपत्रे नसली तरी त्यांचे राहणीमान, व्यवसाय, त्यांच्या घरातली परिस्थिती हे सर्व तपासण्याची पद्धत निश्चित करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

See also  प्रशांत पाटील यांचा शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मान : शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगीरीबददल खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे पुरस्काराचे वितरण