पुणे : औंध येथील ग्रामदेवतेचा वार्षिक उत्सव यंदा रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा औंधगाव विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली. परंपरेप्रमाणे भैरवनाथ मंदिरात आयोजित ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीदरम्यान नीलकंठेश्र्वर मंदिरात श्री गणेश पूजन व शिवपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पंचांग पूजन व वाचन करण्यात आले. औंधगाव विश्वस्त मंडळाचा अहवाल व जमाखर्चाचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या मांडत त्यावर सूचना देखील केल्या.
औंधगाव व्यायाम मंडळाच्या वतीने ग्रामस्थांसाठी वैकुंठरथ देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच पुण्यनगरीचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नवनिर्वाचित नगरसेविका भक्तीताई गायकवाड, सपनाताई छाजेड आणि नगरसेवक सनीदादा निम्हण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
या बैठकीस अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सचिव गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे यांच्यासह विश्वस्त व सल्लागार उपस्थित होते. सर्वांच्या चर्चेनंतर रविवार, ०३ मे २०२६ ही उत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली.























