वडकी येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

वडकी : संघ शताब्दी वर्षानिमित्त वडकी येथे आयोजित विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडले. सुमारे ८०० पुरुष व ३५० महिलांची भव्य उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता धर्मयज्ञाने झाली. १८ पगड जातीतील ३६ महिला व पुरुषांनी १००८ आहुती अर्पण करत सामाजिक समरसतेचा आदर्श घालून दिला. त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते गोमाता पूजन व वृक्ष पूजन करण्यात आले.

श्री. भाऊसाहेब मोडक ऑर्केस्ट्रा यांच्या सुरेल सादरीकरणातून देव, देश आणि धर्मभावनेने ओतप्रोत गीतांनी वातावरण भारावून गेले. यावेळी ४६ शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच वेळी मान्यवरांच्या हस्ते “स्वामी विवेकानंद अभ्यासिका” या उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रवीर संघाच्या तरुण-तरुणींनी श्री सूरज नरवडे यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना थक्क केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त १०० कन्यारत्नांचे सामूहिक कन्या पूजन व बलिदान मास पाळणाऱ्या १५० विद्यार्थ्यांचा सत्कार यामुळे कार्यक्रमात विशेष पवित्रता निर्माण झाली.

धर्माचार्य श्री अशोक नाथ पालवे यांच्या आशीर्वचनांनी धर्मतेज जागृत झाले. प्रमुख वक्ते श्री अंकुर उमडेकर यांनी हिंदू समाजासमोरील आव्हाने व संघटित समाजाची शक्ती यावर प्रभावी मार्गदर्शन केले. मातृशक्ती प्रतिनिधी सौ. मेनका उमडेकर यांनी स्वबोध, कुटुंब प्रबोधन व पर्यावरण याविषयी मर्मस्पर्शी विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित दादा मोडक यांनी सिंहगर्जना करत धर्मनिष्ठा, त्याग आणि संस्कृती जतन करण्याचे आवाहन केले.

सौ. दिपिका तांबेकर यांच्या अखंड “वंदे मातरम्”ने कार्यक्रमाची सांगता झाली व त्यानंतर महाप्रसादाने सर्वांनी एकात्मतेचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर मोडक व सौ. दिपिका तांबेकर यांनी केले. तसेच श्री प्रविण मोडक, अनिल पवार, कल्पेश दीक्षित, राहुल काळेल, श्रीकृष्ण लोंढे, सूरज उपाध्याय, शेखर मोडक, रतिलाल कोळी, शरद बरकडे, कैलाश ओझा, बिभीषण पोटरे, ज्ञानेश्वर करचे, ओंकार पांचाळ, मकरंद कमठनकर, संदीप जाधव, अक्षय जाधव, किरण गुंजाळ व इतर संघ स्वयंसेवकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून कार्यक्रमाची उत्कृष्ट व्यवस्था पार पाडली.

See also  दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले : राहुल डंबाळे; नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी तर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात कॅण्डल मार्च व निषेध सभा