औंध : औंध बाणेर वार्ड ऑफिसमध्ये सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला कमिटीची मीटिंग झाली. औंध, बाणेर बालेवाडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, लमाण तांडा, म्हाळुंगे या भागातील नागरिक उपस्थित राहून आपापल्या भागातील समस्या मांडल्या.
बाणेर बालेवाडी नागरिक मंचच्या वतीने या भागातील मांडलेल्या महत्वाच्या मुद्यात बालेवाडी येथील ममता चौकात सिग्नल बसाविणे, साई चौकातील कचरा शेड हटविणे, लक्ष्मी माता मंदिर युनियन बँक समोरील रस्ता दुभाजाक दुरुस्त करणे, बाणेर येथील अँजोर सोसायटी लगत देवनदीच्या पुलावर टाकले जाणारे ड्रेनेज पाईप लाईन साठी वृक्षतोडिस प्रतिबंध, बाणेर येथील सायकर चौकात केलेल्या शुशोभीकरण येथील अतिक्रमण हटविणे, मुरकुटे गार्डन समोरील फुटपाथवरील भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे आदी प्रश्न उपस्थित केले.
पाषाण मधील चत्तुर यांनी मुद्दा मांडला की बाणेर पाषाण लिंक रोडवर नवीन पासपोर्ट ऑफिस झाले आहे. पण त्यांचे स्वतःचे पार्किंग नसल्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क होतात त्याचा बंदोबस्त व्हावा. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला भरविले जाणारे आठवडी बाजार यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. औंध परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनीही त्यांच्या समस्या मांडल्या.























