पटवर्धन बाग टँकर पॉईंटवरील बंद मीटरमुळे मोफत पाणी वितरणावर प्रश्नचिन्ह

पुणे, प्रतिनिधी – एरंडवणे येथील पटवर्धन बाग टँकर पॉईंटवर पाणी मोजणीचे मीटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आल्याने पुणे महानगरपालिकेच्या मोफत टँकर पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित मीटर 16 डिसेंबर 2025 पासून कार्यरत नसल्याची माहिती पाहणीदरम्यान उघड झाली.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. “मीटरच बंद असल्यास नेमके किती टँकर भरले गेले आणि किती पाणी वितरित झाले याचा हिशोब कसा ठेवला जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पटवर्धन बाग येथून प्रभाग क्रमांक 10, 11, 29, 30, 31, 32 आणि 33 या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार मोफत टँकर पाठविण्याची व्यवस्था मनपामार्फत करण्यात आली आहे. मात्र मीटर बंद असल्यामुळे या पुरवठ्याच्या अचूक नोंदीबाबत शंका निर्माण झाली आहे.

काही वर्षांपूर्वीही या ठिकाणी अनियमितता उघडकीस आली होती. रजिस्टरमध्ये 18 टँकरची नोंद असताना प्रत्यक्षात 50 टँकर भरले गेल्याचे गुप्त चित्रीकरणातून समोर आले होते. त्यानंतर सर्व टँकर पॉईंटवर मीटर बसविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा मीटर बंद असल्याने जुने प्रकार पुन्हा घडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, टँकर वितरणाच्या नोंदींमध्येही त्रुटी आढळून आल्या आहेत. रजिस्टर किंवा चलनावर संबंधित सोसायटी किंवा नागरिकांची स्वाक्षरी नसल्याने वितरणाची खात्री करणे कठीण होत आहे. तसेच टँकर कोणाच्या मागणीनुसार पाठविण्यात आला याची नोंदही ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर खर्डेकर यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार करून सर्व टँकर पॉईंटची तात्काळ तपासणी करावी, बंद मीटर सुरू करावेत आणि प्रत्येक वितरणानंतर लाभार्थ्यांची स्वाक्षरी अनिवार्य करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, भविष्यातील 24×7 पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवर सध्याची मीटर देखभाल व्यवस्था ढिसाळ असल्याची टीका करत, “आजच मीटर महिनोनमहिने बंद असतील, तर उद्या लाखो मीटरची देखभाल कशी होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी मनपाकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  सिटी पोस्टच्या सेवेला शंभर वर्षे झाल्यानिमित्त पोस्टमनचा विशेष सन्मान