पाषाण तलावात जलपर्णीचा विळखा; मासे मृत्यू, दुर्गंधीने नागरिक त्रस्त

पुणे | प्रतिनिधी : पाषाण तलाव येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी (Water Hyacinth) साचल्यामुळे तलावातील पर्यावरणीय समतोल बिघडला असून मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. तलावात दूषित पाणी सोडले जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जलपर्णीने तलावाचा मोठा भाग व्यापला असून त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी अनेक मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत. ज्या ठिकाणी जलपर्णी कमी आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणात मासे एकत्र जमा झालेले दिसत आहेत.

याशिवाय, जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तलाव परिसरातील जैवविविधतेवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने जलपर्णी हटविण्याची मागणी केली असून, तलावात सोडले जाणारे दूषित पाणी थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

See also  पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार मुरलीधर मोहोळ