लोणीकंद येथे भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा; जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लोणीकंद (पुणे) : भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस आज लोणीकंद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त लोणीकंद येथील जिल्हा कार्यालयात पक्षाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला.

भाजपाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली असून भारतीय जनसंघ या पक्षाच्या वैचारिक पायावर उभी राहिलेली भाजपा आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय संघटनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘राष्ट्रवाद, सुशासन आणि अंत्योदय’ या तत्त्वांवर चालणाऱ्या पक्षाने देशाच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले आहे.

संघटनात्मकदृष्ट्या भाजपा ही शिस्तबद्ध आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष म्हणून ओळखली जाते. बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजबूत जाळे उभे करून जनतेशी थेट संवाद साधण्यावर पक्षाने विशेष भर दिला आहे. “सबका साथ, सबका विकास” या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा मानला जातो.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रदेश क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, मनपा नगरसेवक रामभाऊ दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सातव, माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव शेळके, हवेली नगर रोड मंडल अध्यक्ष विजय जाचक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओंकार कंद, डॉक्टर सेल अध्यक्ष मच्छिंद्र काशीद, तसेच माजी ‘मन की बात’ संयोजक बापूसाहेब काळे यांच्यासह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पक्षाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत देशसेवा व समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.

See also  सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी