केजरीवाल यांना सीबीआयने दिलेल्या नोटिस विरोधात आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आपचा राज्यभर सत्याग्रह;पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळी फीत बांधून निषेध

पुणे : सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. पुण्यात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. यावेळी दिवसभरासाठी काळी फीत दंडाला बांधून मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.

तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच मनीष सिसोदिया यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले असल्यामुळे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. यापूर्वीच जगभर त्यांच्या कामाची स्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे असे यावेळेस आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी यावेळेस केला.

मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने त्यांच्या विरोधातील आवाज दडपण्याचं काम करीत आहे. ज्या मद्यअबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाब मध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले असून तेथे तब्बल ४० टक्क्याहून अधिक उत्पन्न वाढले आहे. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा अनेकांवरती दबाव आणून त्यांना हवी तशी साक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अबकारी धोरण हे निमित्तमात्र असून मोदी सरकारला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची धास्ती वाटत असल्यानेच हे दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे. त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असे पुणे शहर समन्वयक डॉ अभिजीत मोरे यांनी म्हटले.

See also  बारामतीमध्ये ‘ईएसआयसी’च्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे स्टेशन येथील आंदोलनात पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, पुणे शहर सहसमन्वयक सुजीत अग्रवाल, किशोर मुजुमदार, अजय मुनोत, फेबियन आण्णा सॅमसन, शिवाजी डोलारे, मीरा बिघे, सिमा गुट्टे, सुरेखा भोसले, श्रद्धा शेट्टी, प्रीती निकाळजे, साहील परदेशी, मिताली वडवराव, संजय कोणे, राजुभाऊ परदेशी, किरण कांबळे, ऋषिकेश मारणे, निलेश वांजले, पाडळे आर.ए, मनोज फुलावरे, मनोज शेट्टी, उत्तम वडवराव, ॲड गुणाजी मोरे, सेंथील अय्यर, सतीश यादव, अभिजीत परदेशी, शंकर थोरात, अमोल मोरे, प्रशांत कांबळे, अल्ताफ शेख, गजानन भोसले, अविनाश भोकरे, अजय परच्या, वीरेंद्र बिघे, हेमंत बिघे, संजय कटारनवरे, ऋतुराज शेलार, अक्षय शिंदे, दत्तात्रेय कदम, अॅड गणेश थरकुडे, स्वप्नील गोरे, विकास चव्हाणआदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.