महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा ‘गुड मॉर्निंग ग्रुप’ तर्फे सत्कार

पुणे: दि. २९ एप्रिल २०२६ रोजी कात्रज येथील मोरे बाग येथे ‘गुड मॉर्निंग ग्रुप’ तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बुधवार सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

‘गुड मॉर्निंग ग्रुप’ हा सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणारा समूह असून, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध उपक्रम राबवितो. साहित्य संमेलनांना भेटी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच विविध स्तरांतील गरजूंना मदत अशा उपक्रमांद्वारे हा समूह समाजात सकारात्मक कार्य करत आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. एस. बी. लोहोकरे यांनी प्रास्ताविकातून ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री. अनिल जगताप यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेत नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण, कोषाध्यक्ष श्री. प्रदीप निफाडकर, कार्यवाह श्री. सुनील महाजन, सौ. अंजली कुलकर्णी तसेच डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या सदस्यांचे या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

अध्यक्ष श्री. योगेश सोमण यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “हा सन्मान व्यक्तीचा नसून पदाचा आणि जबाबदारीचा आहे.” पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात या पदाला पूर्ण न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच कार्याचा ‘बॅलन्स शीट’ समाजासमोर मांडण्याची ग्वाही दिली. याचबरोबर ‘आनंदगाथा’ हा विशेष कार्यक्रम ‘गुड मॉर्निंग ग्रुप’साठी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘गुड मॉर्निंग ग्रुप’चे सदस्य तसेच भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, साहित्यप्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत यशस्वीपणे पार पडला.

See also  ड्रग्ज मुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखनाद: अमली पदार्थाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा