पुणे : भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या संशोधन कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून “A Root Canal Obturation (RCO) System” (ए रूट कॅनल ऑब्टुरेशन सिस्टिम) या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
दंत अभियांत्रिकी क्षेत्रातील उपचार अधिक परिणामकारक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रूट कॅनल प्रक्रियेमध्ये अधिक अचूकता आणि कार्यक्षमता साधण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात या संशोधनाची विशेष दखल घेतली जात आहे.
भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, संस्थेमध्ये संशोधन आणि नवोपक्रमाला सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. संशोधकांच्या परिश्रमातून आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून संस्थेची शैक्षणिक ओळख अधिक दृढ होत आहे. हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संशोधनामध्ये डॉ. स्वानंद पाचपोरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि संशोधननिष्ठ कार्यामुळे हे संशोधन यशस्वी झाले. तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम तसेच आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या संशोधन आणि नवोपक्रम परंपरेला मिळालेली ही महत्त्वपूर्ण मान्यता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या संशोधन परंपरेला मिळालेली ही महत्त्वाची मान्यता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
















