पुणे : वाहनधारकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा फटका बसला असून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने सीएनजीच्या दरात प्रति किलो ₹1.50 ने वाढ जाहीर केली आहे. ही नवीन दरवाढ ८ मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
दरवाढीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात सीएनजीचा नवीन किरकोळ दर ₹92.25 प्रति किलो इतका झाला आहे.
एमएनजीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या इनपुट खर्चामुळे ही दरवाढ करावी लागली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, दरवाढीनंतरही सीएनजी हे पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 45 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 22 टक्के स्वस्त पर्याय राहणार आहे. तसेच रिक्षा चालकांसाठी डिझेलच्या तुलनेत सुमारे 24 टक्के बचत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजी (PNG) गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सीएनजी दरवाढीमुळे खासगी वाहनधारक, रिक्षाचालक तसेच व्यावसायिक वाहन चालकांच्या खर्चात वाढ होणार असून याचा परिणाम प्रवासी भाड्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















