महादजी शिंदेच्या‌ दरबारातून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम -डॉ .सदानंद मोरे

वारजे : “छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य वाढवत पुढे अटकेत पार झेंडा लावला. तर दिल्लीचे‌ तख्त ताब्यात घेऊन ते कोण सांभाळणार याचा निर्णय महादजी शिंदे घेत. महादजी कवी असल्याने त्यांनी‌ मराठी हिंदीतून भजन लिहिली. त्यांच्या दरबारात कला, साहित्याला राजश्रय होता. परिणामी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम त्यांच्याच दरबारातून झाल्याचा आढळतो. म्हणूनच मराठ्यांचा गौरवशाली इतिहास असलेल्या दिल्लीत यंदाचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे.” असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मोरे होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. बालसाहित्यिक राजीव तांबे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.माधवी वैद्य, प्रसिद्ध चित्रकार रूपेश पवार, माजी उपमहापौर दिलीप बराटे, बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ‌ मान्यवर उपस्थित होते.


देशाच्या जीडीपी वाढविणे, उत्पन्न वाढले पाहिजे हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे, समाजाचा बौद्धिक आणि मानसिक स्तरावरील दर्जा देखील उंचावला पाहिजे. असे सांगून डॉ.मोरे म्हणाले, संत साहित्याने वारकरी संप्रदाया सोबतच मराठी साहित्यचाही पाया रचलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात मराठी भाषा ही अतिप्राचीन भाषा आहे हा एक आधार होता. परंतु जागतिक पातळीवर अभिजाततेच्या कसोटीवर खऱ्या उतरतील अशी एक ही साहित्यकृती युरोपीयन आधुनिक भाषेत होत नव्हती. संत ज्ञानेश्वरांनी १३ व्या शतकांत ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीनंतर ३० वर्षांनी युरोपांमध्ये आधुनिक भाषांमध्ये इटालियन भाषेत ग्रंथ निर्मिती झाली. हे मराठी भाषेचे मोठे सामर्थ्य आहे.


चाकणकर म्हणाल्या, ‘संमेलनाच्या माध्यमातूनच वैचारिक चळवळ उभी राहते. तसेच साहित्याच्या क्षेत्रात नव्याने प्रयत्न करणाऱ्यांना ही साहित्य संमेलने उपयोगी ठरतात’. बराटे यांनीही अशा साहित्य संमेलनांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. चित्रकार रुपेश पवार यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.‌ बालसाहित्यिक राजीव तांबे, वारकरी व सामाजिक रत्न सतिश बोडके, उद्योगरत्न संजय भोर, यांना पुरस्काराने गौरविले.
निबंध स्पर्धा विजेत्यांचा सत्कार खुला गट- नंदिनी सातारकर, शालेय गट विषय मला आवडलेले लेखक कवी- परी रफिक शेख, नेहा राम जाधव, सान्वी अंकुश वांजळे, भक्ती साखरे,  धनिका  प्रशांत मालुसरे, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिगंबर जोशी व शरद जयकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, संस्थेच्या पहिल्या स्मरणिकेचे प्रकाशन‌ मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचलन चंद्रकांत पंडित यांनी केले.

See also  एकता महिला ग्रुप चा नवरात्री विशेष नवदुर्गा सन्मान सफाई कामगार महिलांचा सन्मान