पाषाण : बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि रस्त्यांच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः काँक्रीट मिक्सर ट्रक आणि इतर अवजड वाहने सर्रास रस्त्यांवर व फुटपाथवर उभी केली जात असल्याने पादचारी आणि वाहनचालकांसाठी गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांकडून कोणतीही वाहतूक नियोजन व्यवस्था न करता थेट सार्वजनिक रस्त्यांवर काँक्रीटचे ट्रक उभे केले जातात. काही ठिकाणी तर संपूर्ण रस्ताच बंद करून काँक्रीट ओतण्याची कामे केली जात असल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत आहे. फुटपाथवर उभ्या केलेल्या अवजड वाहनांमुळे फुटपाथ तुटत असून रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.
नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक रस्ते हे कोणत्याही खासगी प्रकल्पासाठी अडविण्याचा अधिकार कोणालाही नसताना काही बांधकाम व्यावसायिकांकडून उघडपणे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पालिकेच्या बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रस्त्यांवर काँक्रीट ट्रक उभे करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांना स्वतंत्र पार्किंग व मटेरियल हाताळणीची सक्ती करावी, अन्यथा कामे बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
















