पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात बैलगाडी व टांगा मोर्चा

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढण्यात आला.

शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे महागाईत भर पडत असून सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला की, पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.

या आंदोलनात गटनेते काकासाहेब चव्हाण, महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, नगरसेवक गफुरभाई पठाण, नगरसेविका अनिताताई इंगळे, रविंद्रअण्णा माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कर्वेनगर व दुधाने वस्तीमध्ये पदयात्रेद्वारे प्रचार