प्रकाश जावडेकर कुठे आहेत? सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाने भाजपमध्ये खळबळ

पुणे : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर हे भाजपच्या राजकारणात सध्या आहेत कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या सवालामुळे महाराष्ट्राच्या भाजपमध्ये खळबळ उडाली.

भारतीय जनता पक्षात २०१४ सालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते ‘आयात’ करण्यात आले. अशा ‘आयात’ नेत्यांना पक्षात महत्त्व आले आणि २०१४ सालापूर्वी भारतीय जनता पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा निष्ठेने काम करणारी मंडळी हळूहळू मागे पडली आणि आयारामांना पक्षात महत्त्व आले. विखेपाटील, संजय काकडे अशा नेत्यांना पक्षाच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळू लागले. पुणे महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये ४०हून अधिक नगरसेवक अन्य पक्षांमधून भाजपत आलेले आहेत. त्यांना उमेदवारी देताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाकारले गेले. त्यामुळे अनेक वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात दुखावले गेल्याची सल आहे. त्यांची ही दुखरी सल सुप्रिया सुळे यांनी प्रश्नाच्या माध्यमातून दाखवून दिल्याने महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली.

राष्ट्रीयकृत बँकेतील नोकरी सोडून प्रकाश जावडेकर यांनी संघ कार्याला वाहून घेतले. संघाच्या आदेशाने ते भाजपचे काम करू लागले. पक्षामधे प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते अशा जबाबदाऱ्या जावडेकर यांनी सांभाळल्या. पक्ष निरीक्षक म्हणूनही त्यांनी अनेक राज्यात काम केले. विधानपरिषद सदस्य, राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय राज्यमंत्री अशा पदांवर त्यांनी काम केले. अलीकडे काही वर्षे मात्र पुण्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये जावडेकर यांना महत्त्वाचा रोल देण्यात आला नव्हता. व्यासपीठावरही ते क्वचितच दिसले.

त्यामुळे जावडेकर कुठे आहेत? हा प्रश्न आता उपस्थित झाला. जावडेकर यांनी आम्हाला वैचारिक विरोध नेहमीच केला. तरीही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आम्हाला त्यांचा आदर वाटत राहिला, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले.

See also  सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करून निषेध