पुणे, प्रतिनिधी :पुणे परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आला असून अनेक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीत पुणे आणि कोकण या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. कोकण मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मात्र मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर सकाळपासून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र सर्व इच्छुकांना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये असंतोष वाढला आहे.
विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी उघड विरोध दर्शविला आहे. त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली असून त्यांच्या भूमिकेला पक्षाचे नेते रामदास गाडे यांनी पाठिंबा दिला आहे. टिंगरे यांना उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ गाडे यांनी पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घोले यांनीही उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “मी गेली १२ वर्षे पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. साखर कारखाना आणि मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पक्षातील सर्व इच्छुकांमध्ये मी वरिष्ठ असूनही मला उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे मी नाराज आहे,” असे घोले यांनी सांगितले.”गेली ४० वर्षे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी काम केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी देण्यात आल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात मी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे पुणे मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून पक्ष नेतृत्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















