पुणे, दि. ९ जून २०२६ : पुणे शहराच्या उत्तर-पूर्व भागात नागरिकांना गढूळ, पिवळसर तसेच कमी दाबाने आणि कमी वेळेस होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती, धानोरी परिसर तसेच भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत कुरुळी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान माजी सभासद अश्विनी भंडारे, संगीता दांगट, अनिल टिंगरे, नंदिनी धेंडे, रवी (हर्षल) टिंगरे, शितल सावंत, सुहास टिंगरे, अनिल सातव आणि रामदास दाभाडे उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांच्या व प्रतिनिधींच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील समस्या आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या.
आयुक्त नवल किशोर राम यांनी कुरुळी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रत्यक्ष पाहणी करून पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. गढूळ व पिवळसर पाण्याच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन तज्ज्ञांची मदत घेऊन पुढील दोन दिवसांत समस्येचे निराकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार तज्ज्ञांची पाहणी बुधवार, १० जून रोजी होणार असून त्यांच्या अहवालानंतर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार आहेत.
भामा-आसखेड प्रकल्पाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणींचाही आयुक्तांनी आढावा घेतला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) अधीक्षक अभियंत्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच भामा-आसखेड प्रकल्पातून सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत या योजनेवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या करू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, भामा-आसखेड प्रकल्प व्यवस्थापक रामदास तारू, अविनाश सपकाळ, विजय केळकर, एकनाथ गाडेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलशुद्धीकरण केंद्रातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















