पुणे : आम्हीही पुणे मनपा प्रशासनाचे कामगार आहोत आम्हालाही कामगार कायद्यानुसार आमच्या सामाजिक सुरक्षा, कामगाराचे हक्क का भेटत नाही असा प्रश्न कामगार नेते राष्ट्रीय मजदूर संघाचे(RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. मनपा मुख्य प्रवेशद्वारावर आयोजित इशारा आंदोलनात ते बोलत होते. गेल्या वर्षभरात कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याबाबत संघटनेने दिलेला लढा, प्रशासन करत असलेली या बाबतची दिरंगाई याबाबत माहिती या आंदोलनावेळी देण्यात आली.
कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या एवढा बोनस मिळालाच पाहिजे, ठेकेदार बदलला तरी कामगार तेच राहिलेच पाहिजे, कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळालीच पाहिजे,कंत्राटी कामगारांना कायम कामगारां येवढेच वेतन व सवलती मिळाल्याच पाहिजेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मागण्या मान्य नाही केल्या तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचे अध्यक्ष कामगार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आमरण उपोषणाला बसतील असा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, प्रतिनिधी विजय पांडव, सरिता धुळेकर, गोरखनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.
तसेच पगार 10 तारखेनंतर मिळाला पाहिजे हा नियम असतानाही न मिळणारा पगार, पगाराची स्लीप, युनिफॉर्म, वेळेवर जमा न होणारा PF अशा अनेक मुद्यांवरचे प्रश्न उपस्थित कामगारांनी उपस्थित केले. आभाळाची आम्ही लेकरे, सवालाचा जवाब दे रे मनपाच्या प्रशासना ही गाणी तसेच बोनस आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचा, ठेकेदार व अधिकाऱ्याचं नातं काय होऊ द्या चर्चा या घोषणा ही यावेळी घेण्यात आल्या.