मेट्रो स्थानक उभे राहिले, पण पार्किंगचे नियोजन कुठे? एसएनडीटी परिसरातील नागरिकांचा सवाल

पुणे, प्रतिनिधी : कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरातील वाढत्या पार्किंग अव्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या दैनंदिन त्रासात भर पडत असल्याचा आरोप करत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महामेट्रोकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या निवेदनात खर्डेकर यांनी म्हटले आहे की, कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्थानक हे शहरातील अत्यंत वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून स्थानक उभारताना वाहनतळाच्या नियोजनाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी स्थानकाजवळील अरुंद कॅनॉल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत.

या परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत, विविध व्यावसायिक आस्थापने, नर्सरी, गॅरेज तसेच बांधकाम साहित्य विक्री केंद्र असल्याने आधीच वाहतुकीवर ताण आहे. त्यातच मेट्रो प्रवाशांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पांडुरंग कॉलनी, अभिनव विद्यालय आणि पंडित दीनदयाळ शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरही पार्किंगचा प्रश्न तीव्र होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मेट्रो प्रवाशांनी आता पांडुरंग कॉलनी परिसरातही वाहने पार्क करण्यास सुरुवात केली असून भविष्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, शालेय विद्यार्थी आणि करिष्मा सोसायटीपर्यंत या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय स्थानकाखाली रिक्षा स्टँड आणि पीएमपीएमएलचे व्यस्त बसस्थानक असल्याने वाहतूक व्यवस्थेवरील ताण अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महामेट्रो, पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासकीय विभागांनी संयुक्त पाहणी करून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा  रिपब्लिकन पक्षाची मागणी