पौड (यश नवले) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटावडे शाखेच्या स्थलांतर समारंभानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंज, सभापती मंदाताई शेळके, आरपीआय जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, पंचायत समिती सदस्य काजलताई मोरे, माजी सभापती कोमलताई वाशिवले, स्वातीताई ढमाले, दिपालीताई कोकरे, माजी सदस्य स्वातीताई हुलावळे, भगवान नाकती, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर, सचिन अमराळे, लहू चव्हाण, पंकज हरपुडे, सागर साखरे, संचालक धैर्यशील ढमाले, यशवंत गायकवाड, बाबाजी शेळके, संतोष दबडे व तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुळशी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सचिव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी कर्ज, ठेव कर्जमाफी, सोसायटीचे कर्ज, शेतमालाला मिळणारा योग्य मोबदला याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँक असून बँकेच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, या उद्देशाने बँकेचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ चांदेरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तालुक्यातील अनेक गावांतील सोसायट्यांच्या चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यावेळी सन्मान करण्यात आला व त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष सुनीलभाऊ चांदेरे म्हणाले, “येणाऱ्या काळात मुळशी तालुक्यातील सहकार चळवळ अधिक सक्षमपणे पुढे गेली पाहिजे. शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, हाच आमचा प्रयत्न आहे.”
















