रसिकांना मंत्रमुग्ध, गदिमामय करणारा ‘गदिमा महोत्सव’
मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत निगडी येथे दोन दिवसीय महोत्सव; गानमैफलीतून आठवणींना उजाळा

पुणे : देव देव्हाऱ्यात नाही, विठ्ठला तू वेडा कुंभार, बाई मी विकत घेतला श्याम, कानडा राजा पंढरीचा अशी भाव आणि भक्तीपर रचना… कुरवाळु का सखे, हृदयी प्रीत जागते, नवीन आज चंद्रमा, सांग तू माझा होशील का? अशा प्रेमगीतांनी… का रे दुरावा, एक धागा सुखाचा यांसारख्या विरहगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध गायक श्रीधर फडके व गायिका निश्चल यांच्या सुरेल व मनाला भुरळ घालणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांची माने जिंकली.

निमित्त होते, आधुनिक वाल्मिकी, प्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रपट कथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय गदिमा महोत्सवाचे! शनिवार व रविवारची संध्याकाळ गदिमांच्या आठवणीने उजळून निघाली. या महोत्सवाची संकल्पना, निर्मिती व प्रस्तुती गायिका मनीषा निश्चल यांची होती. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात महक संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजिला होता.

विख्यात गायक-संगीतकार सुधीर फडके यांच्यावरील ‘स्वरगंधर्व… सुधीर फडके’ या चरित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी या निमित्ताने सुधीर फडके यांच्याबद्दलच्या अनेक अपरिचित गोष्टी चरित्रपटातून पाहायला मिळतील, असे नमूद करत प्रेक्षकांशी संवाद साधला. श्रीधर फडके यांनीही बाबुजींबद्दल आठवणी सांगितल्या.

महोत्सवात पहिल्या दिवशी गदिमांचे सुपुत्र व गायक, चित्रपट निर्माता आनंद माडगूळकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पार्श्वगायक हृषीकेश रानडे, सारेगमप, इंडियन आयडॉल, सुर नवा ध्यास नवा अशा रियालिटी शोमधील प्रसिद्ध पार्श्वगायक प्रसन्नजीत कोसंबी, अनेक मान्यवरांकडून गौरवान्वित गायिका मनिषा निश्चल यांच्या सुमधुर गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. बाई माजी करंगळी मोडली, बुगडी माझी सांडली यांसारख्या लावण्या, गोमू माहेराला जाते हो नाखवा, जग हे बंदिशाला, मधू इथे अन चंद्र तिथे, संथ वाहते कृष्णामाई अशा एकापेक्षा एक सदाबहार गीतांना श्रोत्यांनी दाद देत ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली.

या चिमण्यांनो परत फिरा सारख्या गाण्याने अंतर्मुख करायला लावले, तर प्रथम तुझ पाहता जीव वेडावला अशा रोमँटिक गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. खचाखच भरलेल्या सभागृहात कलाकारांच्या कलेला मिळालेली दाद गदिमांच्या स्मृतींना उजाळा देणारी ठरली. मिलिंद कुलकर्णी यांच्या ओघवत्या निवेदनाने सादरीकरणाला साज चढला. मिहिर भडकमकर, अमृता ठाकूरदेसाई, प्रसन्न बाम, डॉ. राजेंद्र दुरकर, अपुर्व द्रविड, ऋतुराज कोरे या वाद्यवृंदाने बहारदार साथसंगत केली.

दुसरा दिवस श्रीधर फडके व मनीषा निश्चल यांनी गाजवला. झाला महार पंढरीनाथ, निजरूप दाखवा हो, एकवार पंखावरुनी, तुझे रूप चित्ती राहो ही भक्तिगीते सादर झाली. मनीषा निश्चल यांनी गायलेल्या पतंग उडवीत होते, रंगु बाजारला जाते हो जाऊद्या, थकले रे नंदलाला या गाण्यांवर श्रोत्यांनी ताल धरला. संथ वाहते कृष्णामाईने हृदयाला हात घातला. वंद्य वंदे मातरमने महोत्सवाचा समारोप झाला. सुकन्या जोशी यांनी निवेदन, तर झंकार कानडे, तुषार आंग्रे, अमेय ठाकुरदेसाई, प्रणव हरिदास, सिद्धार्थ कदम या वाद्यवृंदाने बहारदार साथसंगत केली.

See also  तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील