पुणे, प्रतिनिधी : “वृक्षतोड न करता नदी सुधार योजना राबवता येईल का?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमवेत पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यावर सखोल चर्चा करण्यात आली.
पुणे शहराला नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता आणि समृद्ध परिसंस्थेचा वारसा लाभला असून शहराच्या मध्यवर्ती भागातही नदीकाठावरील नैसर्गिक संपदा आजही अस्तित्वात आहे. हे नैसर्गिक वैभव अबाधित ठेवत नदीचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि पुनरुज्जीवन साध्य करता येऊ शकते, याबाबत उपस्थितांमध्ये एकमत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणीदरम्यान पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, बिपिन शिंदे, संजय कुलकर्णी तसेच नदी आणि पर्यावरण विषयावर कार्यरत असलेल्या ‘जीवित नदी’ आणि ‘रिव्हर रिव्हायवल’ संस्थांचे प्रतिनिधी राहुल करंबेळकर, प्राजक्ता महाजन, अजय फाटक आणि इतर सहकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रकल्पाच्या विविध भागांचा अभ्यास करून पर्यायी उपाययोजनांवर चर्चा केली.
पूर्वीच्या कामांमधील त्रुटी टाळत, विद्यमान वृक्षांचे संरक्षण करत आणि अतिक्रमणमुक्त, स्वच्छ व सुंदर नदीकिनारा विकसित करणे पूर्णपणे शक्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या भूमिकेला आयुक्त नवल किशोर राम यांनीही सहमती दर्शवली. त्यांनी सध्या प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती देण्याची घोषणा केली असून पुढील आठवड्यात वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देणारा सुधारित नदी विकास आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले असून, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधणारा शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारण्याच्या दृष्टीने पुणे शहराने सकारात्मक पाऊल उचलल्याची भावना व्यक्त करण्यात आली.















