पुणे : गोपाळ गणेश आगरकर मार्ग (बीएमसीसी रस्ता) येथील महात्मा फुले महाविद्यालय, दादासाहेब दरोडे सभागृह आणि चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालिकेच्या ठेकेदाराने खोदलेला खड्डा अनेक दिवसांपासून दुरुस्त न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती शिवाजीनगर-कोथरूड विभागाचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित ठिकाणी पालिकेच्या कामादरम्यान रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही खड्डा बुजविण्यात आलेला नाही. हा रस्ता आधीच अरुंद असून परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये असल्याने येथे दिवसभर विद्यार्थ्यांची, पालकांची, रिक्षा व व्हॅन चालकांची तसेच वाहनचालकांची मोठी वर्दळ असते.
सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचत असून तो सहज दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांत येथे अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी मनसेकडे वारंवार तक्रारी केल्याचेही निम्हण यांनी सांगितले.
मनसेने प्रशासनाला दोन दिवसांच्या आत प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “मनसे स्टाईल” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यासोबतच, दुरुस्ती न झाल्यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
— पुणे बुलेटीन
















