पिंपरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीतील पत्रकारांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलक पत्रकारांनी केली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या निषेध आंदोलनात पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलनादरम्यान गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ, विजय जगताप आणि अनिल वडघुले यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारितेवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात भूमिका मांडली.
यावेळी बोलताना गोविंद वाकडे म्हणाले की, “संजय दिना पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही. अशा खासदाराची हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा.”
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनीही संताप व्यक्त करत म्हटले की, “माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील सुसंस्कृतपणा संपुष्टात येत असून आता पत्रकारांनाही लक्ष्य केले जात आहे. सत्तेच्या मुजोरीतून अशी भाषा वापरणाऱ्यांना पत्रकार योग्य उत्तर देतील.”
अविनाश चिलेकर यांनी अशा वक्तव्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला. तर संतोष मिश्रा म्हणाले, “प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. जीवावर बेतले तरी आम्ही आमचे काम करत राहू. कोणत्याही धमक्यांना पत्रकार भीक घालणार नाहीत.”
बाळासाहेब ढसाळ यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत पत्रकारांवरील दबावाचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन केले.
या आंदोलनात मिलिंद कांबळे, अमोल काकडे, नरेश नातू, तुळशीदास शिंदे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे, विकास शिंदे, भानुदास हिवराळे, सुरज कसबे, विश्वजीत पोल्ले, पराग कुंकूलोळ यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते.
पत्रकारांवरील अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करत आंदोलकांनी भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांना कडाडून विरोध केला जाईल, असा इशाराही यावेळी दिला.















