नसरापूर चिमुरडी बलात्कार-हत्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल; आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंड

पुणे, दि. २९ जून: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

यापूर्वी गुरुवारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी शिक्षेवरील युक्तिवादानंतर विविध सर्वोच्च न्यायालयीन निकालांचा संदर्भ देत न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर आरोपीने पूर्वनियोजितपणे रेकी करून पाशवी अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयात भक्कम परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे सादर करत आरोपीच्या वर्तनात कोणताही पश्चात्ताप नसल्याने त्याला कमाल शिक्षा देण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने आरोपीविरुद्धची पुराव्यांची साखळी भक्कम असल्याचे मान्य करत सर्व आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. तसेच समाजात कायद्याचा धाक कायम राहावा आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा, यासाठी या प्रकरणात कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे नमूद केले.

या अत्यंत संवेदनशील खटल्यात ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे, गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अवघ्या १६ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

या निकालामुळे राज्यभरात या प्रकरणाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, बालकांवरील अत्याचारांविरोधात कठोर संदेश देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

See also  ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको!