रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना महापौरांकडून प्रोत्साहन

पुणे : दक्षिण कोरियातील सोल येथे दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या Robotex International Championship 2026 या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या पुण्यातील सात विद्यार्थ्यांची पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. मंजुषा नागपुरे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावर्षी भारतातील विविध राज्यांमधील एकूण ४५ विद्यार्थी आणि ८ मार्गदर्शकांची या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये पुण्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून ते राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग, स्वारगेट; बी. टी. शाहानी नवीन हिंद हायस्कूल, पुणे आणि कर्नल भगत इंग्लिश स्कूल, खडकी या शाळांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. BMC Software India Pvt Ltd आणि Ficci Flo Pune हे या उपक्रमाचे CSR प्रायोजक आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांनी विकसित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण व प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये हिमनद्यांमधील पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी विकसित केलेले Cryo Rover, अन्नाची नासाडी रोखून अतिरिक्त अन्न गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार केलेले Replate AI तसेच मुलींनी अग्निशमन आणि बचावकार्यासाठी विकसित केलेल्या रोबोटिक्स आधारित प्रणालींचा समावेश होता.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. अरुण भगवान राजवाडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या सादरीकरणाची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे कौतुक करताना मा. महापौर सौ. मंजुषा  नागपुरे म्हणाल्या, “पुण्यातील विद्यार्थी रोबोटिक्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे शहराचे आणि भारताचे आत्मविश्वासाने प्रतिनिधित्व करा. आपले विचार मांडताना भाषा अडथळा ठरू देऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सर्वोत्तम कामगिरी करा.”

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागापुरतेच विद्यार्थ्यांचे यश मर्यादित न राहता त्यांच्यासाठी दीर्घकालीन संधी निर्माण होणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. पुणे महानगरपालिका स्तरावर राष्ट्रीय विज्ञान प्रश्नमंजुषा व नवकल्पना स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता तपासण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) सारख्या संस्थांना भेट देण्याची संधी तसेच पुढील टप्प्यांमध्ये नासा (NASA) भेटीसारख्या प्रगत शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन, इंटर्नशिप, रोजगार, पेटंटसाठी सहाय्य आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी प्रारंभिक आर्थिक सहाय्य अशा संधी उपलब्ध करून देणारी सातत्यपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला.

See also  शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी-अजित पवार

यावेळी रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका सुश्री पायल राजपाल यांनी संस्थेच्या गेल्या ११ वर्षांतील कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत देशातील १५ राज्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १५ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. तसेच सुमारे ३५० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

पुणे महानगरपालिका आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने CSR Roundtable आयोजित करून शाळांमध्ये STEM, AI, रोबोटिक्स, तंत्रज्ञान शिक्षण, नवकल्पना आणि रोबोटिक्स उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट संस्थांचे सहकार्य मिळविण्याबाबतही चर्चा झाली. यासाठी रोबोटेक्स इंडियाने विविध क्षेत्रांतील सुमारे १०२ CSR संस्थांचे नेटवर्क उपलब्ध असल्याची माहिती दिली.

महापौरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि पुणे शहरासह देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.