पुणे : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त बाणेर, बालेवाडी, औंध आणि पाषाण परिसरातील व्यापाऱ्यांनी यंदाही एकत्र येत अन्नदानाची परंपरा जपली. गेल्या १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यावर्षी साडेतीन हजार उपवासाच्या पदार्थांची पाकिटे विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांना वितरित करण्यात आली.
वारकऱ्यांपर्यंत सहज पोहोचता यावे, या उद्देशाने सर्व उपवासाचे पदार्थ व्यवस्थित पॅक करून प्रत्येक दिंडीपर्यंत पोहोचविण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत अन्नदानाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी व्यापाऱ्यांनी भक्तिमय वातावरणात “राम कृष्ण हरी” चा अखंड जप करत वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांनीही या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी जपत बाणेर, बालेवाडी, औंध व पाषाण परिसरातील व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नदानाची परंपरा कायम ठेवत समाजापुढे आदर्श निर्माण केला.
















