पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सुमारे ६५ मिनिटे सखोल चर्चा केली.
बैठकीत पोलीस आयुक्तांनी शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि कारवाईची माहिती शिष्टमंडळाला दिली. या चर्चेनंतर काही मुद्द्यांवर समाधान झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनाला काही विधायक सूचना करण्यात येणार असून, त्याची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी त्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांशी पोलीस प्रशासनाने सातत्याने सुसंवाद ठेवणे आवश्यक असल्याचे मत दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आले. या दिशेने पुढील कार्यवाही सुरू करण्यासही पोलीस आयुक्तांनी सहमती दर्शविली.
याशिवाय प्रत्येक पोलीस चौकीनिहाय असलेल्या पोलिसांच्या व्हॉट्सअॅप गटामध्ये संबंधित भागातील लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. या प्रस्तावालाही पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
बैठकीनंतर शिष्टमंडळाने सांगितले की, सर्व मागण्यांवर पूर्ण समाधान झाले नसले तरी चर्चा अत्यंत सकारात्मक वातावरणात झाली असून अनेक मुद्द्यांवर पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
या शिष्टमंडळात माजी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, महापालिका गटनेते काका चव्हाण आणि प्रदेश युवती अध्यक्षा मनाली भिलारे यांचा सहभाग होता.
















