नवी दिल्ली | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जंतरमंतर येथे उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करत त्यांना पाठिंबा दर्शविला.
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रातही विविध शहरांमध्ये निषेध आंदोलने झाली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या खासदारांनीही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धरणे आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदविला.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके हे मराठवाड्यातील असल्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये या आंदोलनाबाबत विशेष उत्सुकता आणि पाठिंबा पाहायला मिळत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि युवकांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.















