नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी आमदार नवाब मलिक यांनी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळं भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित. मलिकांना महायुतीचा भाग करणं योग्य होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे सध्या जामिनावर बाहेर आहेत.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्यासह गोवाला कंपाऊंड जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशद्रोहाचाही आरोप त्यांच्यावर आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. राष्ट्रवादीतील बंडानंतर मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, सभागृहात जाताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि मलिकांबाबत काही सवाल केले. विधिमंडळात जोरदार खडाजंगी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं.