पुणे : सध्याच्या काळात कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी असा संस्थांना शासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी च्या कुलपती पदावर डॉ. स्वाती मुजुमदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां ब मुजुमदार, सौ. संजिवनी मुजुमदार आदि मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या काळात संपूर्ण जगात कौशल्य आत्मसात करण्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कौशल्य प्राप्त झालेली युवा पिढी स्वतःचा आणि पर्यायने समाजाचा व देशाचा विकास घडवू शकते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यांना शासनाकडून सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन पर योजना उपलब्ध करून दिल्या जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॉ स्वाती मुजुमदार यांनी कौशल्य विकासासाठी आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी जागतिक पातळीवर मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षण विद्यापीठ मोठी झेप घेईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला कौशल्य विकास व प्रशिक्षण यामध्ये अग्रेसर स्थान प्राप्त करून देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न सिंबायोसिस आणि मुजुमदार परिवाराने पूर्ण केले आहे. भविष्यात सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ जगातील कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
इंग्रजांनी भारतात सुरू केलेली शिक्षण पद्धती आजही अमलात आणली जात आहे. मात्र, सध्याच्या काळात कौशल्य विकासाला प्राप्त झालेले महत्त्व लक्षात घेऊन सिंबायोसिसने कौशल्य विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. कौशल्य विकास व प्रशिक्षण क्षेत्रात भारत अग्रेसर राहावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली.
गतिमान व प्रगतिशील राजकीय नेतृत्व प्राप्त झाले तर मोठ्या गोष्टी साध्य करणे शक्य होते. सिंबायोसिस कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण विद्यापीठ हे त्याचे उदाहरण आहे, असे डॉ. स्वाती मुजुमदार यांनी नमूद केले. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या विद्यापीठाच्या उभारणीत मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांच्या मनुष्यबळाबाबत गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या विद्यापीठातील अभ्यासक्रम केवळ प्राध्यापक आणि शिक्षण तज्ञ निश्चित करत नाही तर त्यासाठी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना सहभागी करून घेतले जाते. विद्यापीठाचा 200 हून अधिक अग्रेसर उद्योगांशी सहकार्य करार झालेला आहे. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण आणि कारकीर्द घडवण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत, असेही डॉ. स्वाती मुजुमदार यांनी स्पष्ट केले. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य प्रशिक्षण पोहोचविण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात 90% महिलांचा सहभाग आहे. हे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 25 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली.
डॉ. सुनिता निकम, परीक्षा नियंत्रक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र सोनी यांनी आभार मानले.














