भारती बँक ही सामान्यांना कर्ज पुरवठा करणारी आर्थिक लोकसंस्था : डॉ. विश्वजीत कदम

पुणे : ग्राहक सेवा हेच बँकेचे अंतिम ध्येय असून भारती बँक ही सर्वसामान्यांना कर्जपुरवठा करणारी आर्थिक लोकसंस्था आहे, असे प्रतिपादन भारती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. भारती सहकारी बँकेच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात ही सभा पार पडली.

यावेळी भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष डॉ. सचिन वेर्णेकर, संचालक सागर कदम, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. अनंत शिंदे, संजय पेंढारकर, डॉ. प्रदीप जाधव, संचालिका सौ. ऐश्वर्या हार्डीकर, सौ. पूजा नरवाडकर यांच्यासह बँकेचे अन्य संचालक उपस्थित होते.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अर्थसहाय्य मिळावे या उद्देशाने भारती बँकेची स्थापना केली. त्यामुळे आज समाजात भारती बँकेची ‘सर्वसामान्यांची बँक’ अशी ओळख निर्माण झाली आहे. ग्राहकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना समाधानी ठेवणे हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बँकिंग क्षेत्रातील बदलत्या घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आत्मपरीक्षण करणे तसेच भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला तसेच भविष्यातील ध्येयधोरणांचा आराखडा मांडला. यावेळी बँकेच्या २३ शाखांमधून उत्कृष्ट शाखा, परिसर स्वच्छ ठेवणारी शाखा, उत्कृष्ट अधिकारी, लिपिक आणि सहाय्यक सेवक यांचा सन्मान करण्यात आला.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. भारती बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक असून आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रु. २७९०.१२ कोटी इतका झाला आहे. बँकेने रु. २३.२९ कोटींचा ढोबळ नफा तर रु. १४.५३ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. तसेच निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बँकेने १२ टक्के लाभांशाची परंपरा कायम ठेवली असून यंदाही सभेत १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

See also  सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला

यावर्षीपासून बँकेने ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग आणि यूपीआय सेवा सुरू केली असून मोबाईल बँकिंग सेवा यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच अंबक आणि शिवडी या शाखांचे नूतनीकरण करून ग्राहकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैधानिक लेखापरीक्षणामध्ये बँकेने ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे. सभेचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन वेर्णेकर यांनी केले, तर संचालक प्रा. मिलिंद जोशी यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.