अष्टविनायक’ देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. १० : राज्यातील मोरेश्वर (मोरगाव), सिध्दीविनायक (सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महाड), चिंतामणी (थेऊर), गिरीजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या देवस्थानी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात आज अष्टविनायक देवस्थान, एकवीरा व पुणे येथील तारकेश्वर मंदिर देवस्थानातील सुरक्षितता या बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,गृह विभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटे, पुणे,रायगड, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी तसेच अष्टविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, स्थानिक प्रशासनाने आणि देवस्थान ट्रस्टने समन्वयाने काम करून भाविकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्यात. ज्यामुळे भाविकांना आंनदीदायी वातावरण तयार झाले पाहिजे. देवस्थानाच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घ्यावी. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना मंदिराच्या प्रथा- परंपरा जपाव्यात. प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था असावी. घनकचरा व्यवस्थापनासह पार्किंग व्यवस्था, शुध्द पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात.

देवस्थान ट्रस्टच्या अतिरिक्त जमिनी चांगल्या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापराव्यात.तेथील दळण- वळणाची व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची देखभाल करण्यात यावी.अष्टविनायक मंदिर व परिसर चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. भाविकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात यावी. देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सूचना फलक, सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही त्यांनी सांगितले. देवस्थान विकास कामांसाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करावेत. म्हणजे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची व्यवस्था करता येईल. एकविरा देवी व पुणे येथील तारकेश्वर मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने देवस्थानच्या दागिन्यांच्या व अन्य संपत्तीच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

देवस्थानच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष पुढाकार घेत असल्याबद्दल अष्टविनायक देवस्थानाच्या शिष्ट मंडळाच्या वतीने यावेळी डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.

See also  सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशनचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन