महाळुंगे-नांदे रस्त्याच्या दुरवस्थेने अकरा वर्षीय मुलाचा बळी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप; आमदार शंकर मांडेकर व पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांची अपघात स्थळी भेट

महाळुंगे : महाळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्डे, साईड कट आणि रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका अकरा वर्षीय शालेय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

महाळुंगे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येबाबत नागरिकांनी अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाची आणि नागरिकांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर एका निष्पाप शालेय मुलाला जीव गमवावा लागल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

महाळुंगे परिसरासाठी काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण-महाळुंगे हायटेक सिटी प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर टाऊन प्लॅनिंग आणि पीएमआरडीएमार्फत या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानगी देण्यात आली. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

अनेक ठिकाणी जागा ताब्यात न मिळाल्याने रस्ते अर्धवट राहिले आहेत. त्यामुळे काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू असून, वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचा धोका वाढला आहे. पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे मोठे झाले असून, त्यावर साचलेल्या मातीमुळे रस्ते निसरडे झाले आहेत.

निर्बंधाच्या वेळेतही जड वाहनांची वाहतूक
महाळुंगे परिसरात जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतानाही काही वेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची ये-जा सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेने तातडीने रस्ते दुरुस्त करावेत
महाळुंगे परिसरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, साईड कट दुरुस्त करावेत तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीस जबाबदार असलेल्या संबंधितांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातस्थळाची आमदार शंकर मांडेकर तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले की, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाळुंगे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत पुणे महानगरपालिकेला पोलिसांकडून यापूर्वीच निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  महाराष्ट्राचा 58व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

एका अकरा वर्षीय मुलाचा गेलेला जीव हा केवळ अपघात नसून, रस्त्यांच्या दुरवस्थेकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा गंभीर परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन महाळुंगे परिसरातील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.