पुणे : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग पुरस्कृत व पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि विपला फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बाल रक्षा अभियान 2025 अंतर्गत शिक्षक व पालकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमधील पुणे महापालिका व खाजगी शाळांतील शाळा व्यवस्थापन समितीतील सुमारे 300 शिक्षक व पालक सदस्यांनी दोन सत्रांमध्ये बाल रक्षा अभियानाचे प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणात सध्या सर्वत्र लहान मुलांच्या बाबतीत भेडसावणारे बाल लैंगिक छळाच्या अनुषंगाने विविध प्रश्न, यामुळे शाळा, शिक्षक व पालक यांना बालहक्क, बालकांचे अधिकार, बाल लैंगिक शोषण, पॉक्सो कायदा, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, सखी सावित्री समिती, सायबर सुरक्षितता, शाळा सुरक्षितता आणि बालकांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने पालक व शिक्षकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विपला फाउंडेशन, मुंबईचे प्रविण कदम, राहूल शिंदे, पूजा मेढे आणि रेणूका जोगळेकर यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले.यावेळी बालहक्क संरक्षण आयोग, पुणे सदस्य चैतन्य पुरंदरे, जयश्री काळे, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त आशा राऊत, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आदी मान्यवरांनी प्रशिक्षण स्थळी प्रशिक्षणार्थींना भेट देवून मार्गदर्शन केले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.