पौड पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक; महेश मेश्राम यांची नियुक्ती

पौड, दि. ३० ऑगस्ट २०२६ (यश नवले) : पौड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी महेश मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आतापर्यंत पौड पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळणारे संतोष गिरी गोसावी यांची सायबर विभागात बदली करण्यात आली आहे. नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे पौड परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस निरीक्षक महेश मेश्राम हे पोलीस दलातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुंबई, गडचिरोली तसेच पुणे ग्रामीण विभागात सुमारे १५ वर्षे सेवा बजावली आहे. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा अनुभव मिळवला आहे.

पौड परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे, कायद्याचे काटेकोर पालन, वाहतुकीच्या समस्या सोडविणे तसेच चोरीच्या घटनांना आळा घालणे यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी स्पष्ट केले.

पौड परिसराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती वाहतूक आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नव्या पोलीस निरीक्षकांसमोर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याचे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर मेश्राम यांच्या अनुभवाचा पौड परिसराला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

See also  ॲड पांडुरंग थोरवे यांना वारकरी सेवा सन्मान पुरस्कार २०२५ प्रदान