पुणे: ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने युवक व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. जिचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे.
या रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग 10,000 झाडे लावण्यासाठी करण्यात येईल. या मॅरेथॉनला डॉ. जगन्नाथ दीक्षित, डायबेटीस रिव्हर्सल तज्ज्ञ आणि प्रीती मस्के, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक, यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, अदार पूनावाला ग्रुप, जी.एच. रायसोनी कॉलेज, अॅडव्हेंचर आयआयटी, गिरिराज ज्वेलर्स आणि आयव्ही इस्टेट या नामांकित संस्थांनी या अभीनव उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.
पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना हार्टफुलनेस प्रवक्ते विक्रम मकवाना म्हणाले, “या धावण्याच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, मग धावणे असो, जॉगिंग असो किंवा चालणे, हे शाश्वतता आणि सामुदायिक आरोग्यासाठी आहे. हार्टफुलनेसने 2020 पासून 20 लाखांहून अधिक झाडे लावली आहेत आणि 80 हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन केले आहे. या उपक्रमामुळे 1,027 एकर जमीन पुनर्जीवित झाली आहे आणि 25,000 टन कार्बन उत्सर्जनाचे समतोल राखण्यात यश आले आहे. त्यामुळे या हरित आणि आरोग्यदायी उपक्रमाचा भाग बनण्यासाठी greenheartfulnessrun.com येथे त्वरित नोंदणी करा,” असे आवाहनही त्यांनी केले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी, प्रा. चंद्रकांत बोरुडे यांनी सांगितले की, “प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या दृष्टिकोनाला पूरक उपक्रम म्हणून डॉ. मंगेश कराड यांनी या हार्टफुलनेस मिशनला पाठिंबा दिला आहे.”