माण प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट होणार; CSR व शासकीय निधीतून सुसज्ज आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश

माण : (यश नवले, पौड) माण परिसरातील वाढते शहरीकरण आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करून ते अधिक सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात माण येथे संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.

माण परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच प्रस्तावित नगर रचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्कीम) यामुळे निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी परिसरातील वाहतूक व्यवस्था, आरोग्यविषयक प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच माण प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य केंद्राच्या कायापालटाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर माण परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी CSR निधी तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आवश्यक सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

भविष्यात माण येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे नियोजन असून, मुळशी तालुक्यातील आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पंचायत समितीच्या सभापती मंदा शेळके, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  औंध ग्रामदेवतेचा उत्सव मे महिन्यात