बाणेर | प्रतिनिधी : वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेचा २० वा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात कुंदन मंगल कार्यालय येथे पार पडला. गेल्या दोन दशकांपासून बाणेर परिसरातील तुकाई टेकडीच्या हरित संवर्धनासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
सन २००६ पासून तुकाई टेकडीवर लावलेल्या रोपांचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून, संस्थेच्या सातत्यपूर्ण पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने वसुंधरा अभियानाला ‘श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. संस्थेने आतापर्यंत ६० हजारांहून अधिक झाडांची लागवड करून एकेकाळची ओसाड टेकडी जैवविविधतेने समृद्ध अशा हिरव्यागार जंगलात रूपांतरित केली आहे.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून टेकडीवर सलग समतल चर, बंधारे आदी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. संस्थेचे कार्यकर्ते दररोज दोन ते तीन तास अविरतपणे पर्यावरण संवर्धनासाठी श्रमदान करीत असल्याने बाणेर टेकडीचे बदललेले हिरवेगार रूप आज नागरिकांना पाहायला मिळत आहे.
वर्धापन दिन सोहळ्यात संस्थेने वर्षभर केलेल्या कामांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. टेकडीवर सुरू असलेली विविध कामे, भविष्यातील नियोजन तसेच संस्थेचा आर्थिक ताळेबंद याबाबतची माहितीही देण्यात आली. या निमित्ताने विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. राजाभाऊ गूडदे फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, राजा शिवछत्रपती परिवारातील गडसंवर्धन करणारे शिलेदार तसेच ‘गरुड झेप’ अंतर्गत आग्रा ते राजगड मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या शिलेदारांचा वसुंधरा अभियानातर्फे गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित सदस्यांनी मनोगते व्यक्त करून वसुंधरा अभियानाच्या हरित कार्याला शुभेच्छा दिल्या. रवीजी घाटे यांनी वसुंधरा अभियानाच्या कार्याचे कौतुक करताना, सामुदायिक नेतृत्वामुळे संस्था सातत्याने अग्रेसर होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
दोन दशकांच्या या प्रवासात वृक्षलागवड, जलसंधारण आणि जैवविविधता संवर्धनाच्या माध्यमातून बाणेरच्या टेकडीला मिळालेला हिरवा श्वास हा सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.















