मुळशी | प्रतिनिधी : तालुक्यातील उरावडे ते मारणेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता प्रतिभा सोनवणे यांना देण्यात आले.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिसरातील पीएमपीएल बससेवा बंद करण्यात आल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
उरावडे ते मारणेवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवासेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून वाहतूक सुरळीत करावी. तसेच पीएमपीएल बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले यांनी दिला आहे.
यावेळी कृषी उत्पन्न अधिकारी राम गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, नामदेव अप्पा टेमघरे, रामदास पोळेकर, विभागप्रमुख दिलीप मारणे आणि सागर गुजर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.














