विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा

पुणे : – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना त्या ठिकाणी सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.

बैठकीत अष्टविनायक विकास आराखडा सद्यस्थिती, एकविरा देवी शाश्वत विकास व पर्यायी रस्ता, आळंदी पाणी पुरवठा, शहरी भागातील वाहतूक कोंडी, मुळशी येथील अग्निशमन केंद्राची स्थिती, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रश्न, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि गडकिल्ले संवर्धनाचा आढावा घेण्यात आला.

देवस्थानाच्या ठिकाणी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आणि रॅम्पची सोय, गर्दी व्यवस्थापन, तसेच काही ठिकाणी विसाव्याची सोय करण्यात यावी. मंदिराचे जतन आणि संवर्धन करतांना पुरातत्व विभागाच्या सुचनांचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. लेण्याद्री देवस्थान येथील सोलर दिव्यांची सुविधा लवकर करण्यात यावी. आराखडा तयार करताना अग्निरोधक यंत्रणेचाही समावेश करण्यात यावा, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

दुर्गप्रेमींच्या माहितीसाठी पुरातत्व विभागाने जिल्ह्यातील गडकिल्ले आणि स्मारक तसेच त्यांच्या संवर्धनात नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होण्यास मदत व्हावी यादृष्टीने याठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती संकेतस्थळावर द्यावी. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना त्या ठिकाणी सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. गडकिल्ल्यांच्या ठिकाणी मंदिरांचे पावित्र्य राहील यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुळशी येथील अग्निशमन केंद्राचे काम गतीने करावे. विकास आराखड्यात पुरातन वास्तूंचे जतन करण्याच्या कामांचाही समावेश करण्यात यावा. नागरिकांच्या समस्या आणि सूचना ऐकण्यासाठी पीएमआरडीएने महिन्यातील एक दिवस लोकशाही दिन म्हणून निश्चित करावा, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी कार्ला येथील एकविरा मंदिराच्या कामाबाबतही आढावा घेण्यात आला. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी जिल्ह्यातील कामांच्या प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. निवास आणि न्याहरी योजनेअंतर्गत निवास व्यवस्था करण्यासाठी एमटीडीसीला सूचना देण्यात याव्यात, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

आळंदीच्या पाणी प्रश्नांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. तीर्थक्षेत्र आराखडा तयार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि परिसरात जलसंधारणासाठी तरतूद करण्यात यावी. आळंदी-देहू परिसराला लक्षात घेऊन असे प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. अधिक शाळा-महाविद्यालये असणाऱ्या भागात प्रायोगिक तत्वावर अर्ध्या तासाने शाळांची व खाजगी कार्यालयांच्या वेळ बदलून वाहतुकीवर होणारा परिणाम अभ्यासावा अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे गतीने करण्यात येत असून रिंगरोडच्या भूसंपादनाचे कामही वेगाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एनडीए चौकातील उड्डाणपूल प्रकल्पामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.

बैठकीला जिल्हा परिषद, महानगरपालिका, आळंदी नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पोलीस, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

See also  बाणेर येथे सकल मराठा समिती कार्यालयाचे ७ एप्रिलला मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन