परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पी.एच.डी.) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी क्यूएस जागतिक रँकिंग ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावा.

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

See also  कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे!आदेश मागे जनतेमधील रोषाचा परिणाम : आम आदमी पार्टी